उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित लातूर दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार देण्यात येतो. तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामागृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी 25 सप्टेंबरपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, रुपये 50 हजार रुपये, रुपये 25 हजार रुपये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , ग्रंथभेट आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात येते. सन 2023-2024 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छूक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 25 सप्टेंबर, 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु