मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता, आधार सीडिंगला गती द्यावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता, आधार सीडिंगला गती द्यावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. २३ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त काही अर्जामध्ये त्रुटी असल्याने, असे अर्ज ऑनलाईन स्वरुपात परत पाठविण्यात आले आहेत. या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. ज्या महिलांनी अद्याप बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न केलेला नाही, अशा महिलांनी आपले खाते असलेल्या बँकेत जावून बँक खात्यांना आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही करवी. तसेच आतापर्यंत अर्ज न केलेल्या पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगिता टकले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक बालाजी मरे, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रमोद शिंदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. सांगळे यांनी यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम झाली आहे. या योजनेसाठी अद्यापही अर्ज न केलेल्या महिलांना पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करावी. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांना आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. वयोवृद्ध नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळण्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून लाभार्थी नोंदणीला गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या. तसेच वयोवृद्ध नागरिकांचे अर्ज भरून घेण्यासाठी ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणाची संधी देण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने प्रयत्न करावेत. तसेच जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकारी यांनी उद्योग, व्यवसायामध्येही युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
***
Comments
Post a Comment