महिलांच्या सन्मानासाठी सर्वजण संवेदनशील राहूया-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
▪️लातूर शहरातील विविध संघटना, आस्थापनाधारकांशी संवाद
▪️प्रत्येक आस्थापनेत महिला सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात
▪️गणेशोत्सवात स्त्री-सन्मानाचा जागर करण्याचे आवाहन
लातूर, दि. ३१ (जिमाका) : महिलांची सुरक्षा ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. आपल्या संस्कृतीत महिलांना नारीशक्ती म्हटले जाते. त्यामुळे या नारीशक्तीच्या सन्मानासाठी आपण सर्वजण संवेदनशील आणि सजग राहूया, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात शहरातील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, उद्योग, वाहतूक संघटना यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, पोलीस उपअधीक्षक श्री. भातलवंडे यावेळी उपस्थित होते.
आपला लातूर जिल्हा हा संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारा जिल्हा आहे. आपली हीच ओळख कायम राहावी, यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षितेसाठी पुढाकार घेवूया. आपल्या दवाखान्यात, कार्यालयात, उद्योग किंवा कोणत्याही आस्थापनेत काम करणाऱ्या महिला, तसेच शाळा व महाविद्यालयातील मुलींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आस्थापनेने आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. या सर्वांचे हक्क, अधिकार अबाधित राहतील, त्यांच्यासोबत कोणीही गैरकृत्य होणार नाही, यासाठी योग्य खबरदारी घेतली जावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या. तसेच असे गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्यात यावी. तसेच समाजातील महिलांचे महत्व, त्यांच्या संरक्षणासाठी असलेले विविध कायदे याबाबत माहिती देण्यासाठी येत्या गणेशोत्सवात महिलांच्या सन्मानाचा जागर करणारे देखावे सादर व्हावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून यासाठी दामिनी पथके, साध्या वेशातील पोलीस यांची शहरात गस्त सुरु आहे. महिलांशी गैरकृत्य झाल्याची घटना निदर्शनास आल्यास स्वतः संबंधित महिलेने किंवा इतर कोणत्याही व्यक्तींनी पोलिसांना माहिती द्यावी. त्याबाबतीत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल. मनात कोणतीही भीती बाळगता महिलांनी अशा घटनांची तक्रार पोलिसांना द्यावी. अशा महिलांची नावे गोपनीय ठेवण्याची खबरदारी घेतली जाईल. वेळीच अशा घटना रोखल्या तर गंभीर प्रकार टाळता येतात. त्यामुळे गैरकृत्यांची तक्रार त्वरित करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय कठोर कायदे असून त्याबाबत महिलांनी जागरूक राहावे, असे ते म्हणाले.
निवासी शाळा, वसतिगृहे, आरोग्य संस्था अशा विविध ठिकाणी महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी संबंधित आस्थापनाधारकांनी सीसीटीव्ही लावणे आणि ते सतत कार्यरत राहतील, याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. याबाबत केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.
***
‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु
‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु § 10 ऑक्टोबरपासून मूग, उडीद खरेदी § 15 ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी लातूर, दि.7 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2024-2025 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु करण्यात आली असून प्रत्यक्षात मूग,उडिद खरेदी दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 आणि सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय नोडल एजेन्सी नाफेडमार्फत अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात खरेदी केली जाणार आहे. नाफेड कार्यालयाने 19 जिल्ह्यातील 146 खरेदी केंद्राना मंजूरी ...
Comments
Post a Comment