नागरिकांच्या तक्रारींचे गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नागरिकांच्या तक्रारींचे गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
आपले सरकार पोर्टल २.० बाबत जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांना प्रशिक्षण
लातूर, दि. २२ : सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या तक्रारींचे गतीने आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी 'आपले सरकार पोर्टल २.०' ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहीत कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
आपले सरकार पोर्टल २.० प्रणालीच्या वापराबाबत आयोजित प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षक देवांग दवे, विनोद वर्मा, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगिता टकले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत माहिती दिली जाणार आहे. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यांनी सांगितले.
नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले. आता नागरिक आणि शासकीय यंत्रणांसाठी सुसह्य ठरतील, अशा सुधारणा करून 'आपले सरकार पोर्टल २.०' हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रशिक्षक देवांग दवे यांनी सांगितले. तसेच शासकीय कार्यालये, नागरिकांना या पोर्टलचा कशाप्रकारे वापर करता येईल, याबाबत माहिती दिली.
प्रास्ताविक कपील पेंडलवार यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनाचा हेतू विषद केला.
Comments
Post a Comment