शिरूर अनंतपाळ नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक -2021 जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सोयी - सुविधांचा घेतला आढावा

 

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक -2021  

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सोयी - सुविधांचा घेतला आढावा

 

लातूर,दि.16(जिमाका):- राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रमांतर्गत शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2021 च्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यासाठी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली.

यावेळी शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- 2021 च्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी औसा- रेणापुर अविनाश कांबळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अतुल जटाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी मंगेश शिंदे, शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके, गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह  इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2021 च्या  होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी इतर मागास प्रवर्ग यासंदर्भात आयोगाने दिलेल्या निर्देशांचे अनुषंगाने  केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी औसा- रेणापुर अविनाश कांबळे यांनी अशी माहिती दिली की, या निवडणुकीसाठी  एकूण प्राप्त 84 नामनिर्देशन पत्रापैकी इतर मागास प्रवर्ग यासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रं 6,9,12 15 यासाठी  एकूण आठ नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले होते.

यादरम्यान  मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रं. रानिआ/न.प.-2021/प्र.क्रं.6/का-6दिनांक 07 डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्या टप्यावर तात्काळ स्थगित करण्यात आलेली आहे. उर्वरित 13 प्रभागासाठी नियोजित कार्यक्रमानुसार प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये शिरुर अनंतपाळ  नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  69 उमेदवारांनी 76 नामनिर्देशन पत्रे दाखल केली . या नामनिर्देशन  पत्राची सविस्तर छाननी दिनांक 8 डिसेंबर, 2021 रोजी करण्यात आली. यामध्ये 76 पैकी 41 नामनिर्देशन पत्रे वैध तर 35 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली. दिनांक 09 डिसेंबर,2021 ते दिनांक 13 डिसेंबर, 2021 या नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेतली. त्यामुळे निवडून द्यावयाच्या 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

            सदरील निवडणुकीसंदर्भात आजपावेतो झालेल्या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी या  निवडणुकीसंदर्भात 13 मतदान केंद्राचा आढावा घेत असताना मतदान केंद्राची निवड, मतदान केंद्र निहाय सरासरी मतदार, मतदारांची एकूण संख्या, मतदान केंद्रावर दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, यामध्ये  विशेषत: वृद्ध, अपंग व गरोदर स्त्रिया यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा तपशील यावेळी त्यांनी जाणून घेतला.

 याचबरोबर मतदार यादी, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्राची यादी, मद्य विक्रीवरील बंदी, शस्त्र जमा करणे इ. बाबतची कार्यवाही, आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त, मतदान यंत्राबाबत तपशील, मतदान केंद्रावरील अधिकारी  व कर्मचारी यांचे  प्रशिक्षण, मतदार जागृती मोहीम, मतमोजणी बाबतचे  प्रशिक्षण, साहित्य उपलब्धता याबाबतचा सविस्तर आढावा घेवून समाधान व्यक्त केले. यावेळी माननीय महोदय यांनी  ईव्हीएम च्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची व मतदान केंद्र असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या विद्यालय शिरुर अनंतपाळ येथील शाळेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आढावा घेतला. या वेळी तेथे उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक त्या  सूचना दिल्या.



****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु