कासार शिरसी येथे जागतिक मृदा दिन साजरा

         लातूर,दि.6 (जिमाका)- ‘मातीची धूप थांबऊया, भविष्याची शाश्वती करूया हा संदेश देत शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ‘एडीएमॲग्रो इंडस्ट्रीज्, लातूर आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिनांक ०५ डिंसेबर २०२१ रोजी ‘जागतिक मृदा दिनसाजरा करण्यात आला.

          यानिमित्त्ताने ‘जमिनीचे आरोग्य : समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन शिबीर निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे आयोजित कऱण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज् चे प्रमुख मार्गदर्शक टी. पी. शेनॉय, जिल्हा मृद सर्वेक्षण आणि चाचणी अधिकारी ज्योती गिरी, मृदा कृषि शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विलास टाकणखार व वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि विद्यावेता प्रा. अरूण गुट्टे आदी उपस्थित होते.

          याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीजचे मुख्य मार्गदर्शक टी. पी. शेनॉय यांनी एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीजद्वारा राबविण्यात येणाऱ्या शाश्वत शेती उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांना दिली. याअंतर्गत लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार असून एकात्मिक पीक पद्धती, पर्यांवरण, माती, जल, कामगारांचे प्रश्न याबाबतीत मार्गदर्शन केले जाणार असून ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी याअंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती टी. पी. शेनॉय यांनी दिली.

            कार्यक्रमाचे अध्य़क्ष दत्तात्रय गावसाने यांनी शाश्वत शेतीमध्ये सेंद्रीय कर्बाचे महत्त्व, रासायनिक खतांचा संतुलित वापर, जमीन व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच अशाप्रकारची मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली पाहिजेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

           मृदा कृषि शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विलास टाकणखार व प्रा. अरूण गुट्टे यांनी माती परिक्षणांचे महत्त्व, भौतिक, रासायनिक, जैविक घटकांमध्ये समतोल राखून अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, जमीनीचा सामु, क्षारपड जमिनीमुळे निर्माण होत असलेले प्रश्न व पीक फेरबदल याबाबत उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भविष्याच्या शाश्वतीसाठी काळ्या आईची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

            या कार्यक्रमास निलंगा परिसरातील सरपंच, उपसरपंच, वि. स. सोसायटीचे चेअरमन व प्रतिष्ठित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एडीएमचे शाश्वत शेती उपक्रम समन्वयक दयानंद माने, दत्तात्रय सुर्यवंशी आणि सेंद्रीय शेती उपक्रम समन्वयक गंगाधर दिवाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परमेश्वर जेटनवरे यांनी केले तर आभार परमेश्वर बिराजदार यांनी मानले.

                                                                  



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु