जिल्ह्यात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 

जिल्ह्यात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 

         लातूर,दि.3(जिमाका):- जिल्हयातील पशुपालक शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद  व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

          राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध्‍ करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध्‍ करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतीमान ठेवण्याचा नेहमीच प्रयतन केला आहे.          

         विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध्‍ करुन देण्यासाठी  कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे.

           यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षा पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता  वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता योजन करता येणे शक्य होणार आहे.      

             या नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध्‍ करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

          ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://ah.mahabms.com अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव : AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध्‍ ) अर्ज करण्याचा कालावधी  : 04 डिसेंबर 2021 ते 18 डिसेंबर 2021 टोल फ्री क्रमांक 1962 किंवा  1800-233-0418

       योजनांची संपूर्ण  माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या

संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध्‍  आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल. आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध्‍  करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्या करिता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या  स्थितीबाबत संदेश पाठववण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

          योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (ववस्तार ), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

                                                      ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा