देवणी तालुक्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई • वलांडी, कवठाळा येथे तीन ठिकाणी धाडी

देवणी तालुक्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई • वलांडी, कवठाळा येथे तीन ठिकाणी धाडी लातूर, दि. ३० : सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे देवणी तालुक्यातील वलांडी येथील पांडुरंग रामचंद्र पांचाळ यांच्याविरोधात अवैध सावकारी प्रकरणी सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी झडतीची कार्यवाही केली. त्यांच्या वलांडी व कवठाळा येथील राहत्या घरासह वलांडी येथील श्रीराम मोबाईल शॉप अशा एकूण तीन ठिकाणी एकाच वेळी ही कार्यवाही करण्यात आली. लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण व लातूरचे जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतंगले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली ही कामगिरी झाली. या कारवाईत पथक प्रमुख म्हणून दीपक कांबळे, श्याम जाधव आणि रवी गायकवाड यांनी काम पाहिले. या मोहिमेदरम्यान पोलीस विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलीस संरक्षण व पंचांची महत्त्वाची भूमिका निभावली. या झडतीदरम्यान पुढील चौकशीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कथित अवैध सावकारीबाबतच्या हिशोब वह्या तसेच खरेदी-विक्रीचे विविध दस्तऐवज पथकाने ताब्यात घेतले आहेत. सध्या या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये पुढील सखोल चौकशी सुरू आहे. लातूर जिल्हा व देवणी तालुक्यातील सर्व नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण व कठोर कारवाई करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे. अवैध सावकारी करणाऱ्यांविषयीची माहिती सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, लातूर) किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात सादर करावी, असे सांगण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल व आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई केली जाईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती देवणीचे सहायक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी दिली आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत