लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान' महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र प्रमाणपत्र

लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान' महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र प्रमाणपत्र लातूर, दि. २५ : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत सन २०२६ हे वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर ‘महिला शेतकरी कायदा – २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना 'महिला शेतकरी' म्हणून एक नवीन आणि स्वतंत्र ओळख मिळणार असून तसे अधिकृत प्रमाणपत्र त्यांना प्रदान केले जाणार आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिला अधिक सक्षम बनून आपल्या हक्काच्या शासकीय योजनांचा थेट लाभ सहजपणे घेऊ शकतील. या अनुषंगाने सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामीण भागात युवक मंडळ, ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, उमेद, माविम, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि एनजीओ यांच्या सक्रिय सहकार्यातून विविध जनजागृती उपक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये देखावे, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय प्रभात फेऱ्या आणि विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून महिला शेतकरी कायद्याविषयी व्यापक जागृती केली जात आहे. अभियान काळात कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी हे नियोजित बैठका, शेतीशाळा, बचत गट बैठका आणि एफपीओच्या बैठकांना प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थित महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या संवादादरम्यान महिला शेतकऱ्यांना मिळणारे विविध लाभ, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व प्रक्रिया तसेच कृषी विभागाच्या विविध घटकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली जात असून पात्र महिला शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करावी यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सबल बनवणारी ही मोहीम त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असून गावपातळीवर या अभियानाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांनी प्रमाणपत्र प्राप्तीसाठी व शासकीय योजनांच्या लाभासाठी आपल्या गावातील संबंधित मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक किंवा 'कृषी ताई' यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत