सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद
लातूर, दि. २४ : पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, अंधोरी आणि किनगाव परिसरातील या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, गट विकास अधिकारी पंकज शेळके, तालुका कृषि अधिकारी श्री. बावगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीची शासनाला पूर्णतः जाणीव असून शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या संकटाच्या काळात सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल. वेळ पडली तर विकास कामे थांबवू, पण शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.
***



Comments
Post a Comment