जिल्हा स्कूल बस परिवहन समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत चर्चा
जिल्हा स्कूल बस परिवहन समितीच्या बैठकीत
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत चर्चा
लातूर, दि. ३० (जिमाका): पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी जिल्हा स्कूल बस परिवहन समितीची १४ वी बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंग गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर, लातूर शहर वाहतूक नियंत्रण अधिकारी मनोज जिरगे, शिक्षणाधिकारी श्री. क्षीरसागर, विस्तार अधिकारी मधुकर ढमाले, जिल्हा समन्वयक श्री. भापकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक बोयणे, महानगरपालिकेचे श्री. सेवाळकर तसेच लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे श्रीकृष्ण पांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने विविध महत्वपूर्ण उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थी वाहतुकीसाठी लागू असलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संबंधितांसाठी बंधनकारक असल्याचे सांगत, या नियमांची योग्य अंमलबजावणी होत आहे याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची राहील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले. यावर बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंग गवारे यांनी नियमांच्या काटेकोर पालनाबाबत समितीला पूर्ण आश्वस्त केले.
विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना किंवा शाळेतून घेऊन जाताना रस्त्यावर वाहने अनावश्यकपणे उभी राहणार नाहीत, याची संपूर्ण जबाबदारी शालेय परिवहन समिती व शाळा प्रशासनाची राहील. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, तसेच तपासणी यंत्रणांनी वेळोवेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक श्री. तांबे यांनी यावेळी दिल्या.
*****
Comments
Post a Comment