लातूर जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर पाठविण्यास मनाई
लातूर जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर पाठविण्यास मनाई
लातूर, दि. ३० (जिमाका): जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांचा चारा व पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला कडबा, सुका चारा, घास, उसाचे वाडे इत्यादी प्रकारचा चारा जिल्ह्याबाहेर अन्य जिल्ह्यात कोणत्याही व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात घातली आहे.
लातूर जिल्ह्यातून परवानगीशिवाय चारा बाहेर पाठविण्यावर सक्त प्रतिबंध करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक, व्यापारी आणि संस्था यांनी आपल्याकडील चारा प्रथमतः स्थानिक स्तरावर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व गोशाळांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ५८ अंतर्गत कायदेशीर तरतुदींनुसार जप्ती व दंडात्मक कारवाई केली जाईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाले असून पुढील आदेश होईपर्यंत अमलात राहतील.
***
Comments
Post a Comment