शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2026 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2026 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन लातूर, दि.30 (जिमाका) : राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या 2 सप्टेंबर,2026 रोजीच्या परिपत्रकानुसार शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2026 अद्ययावत करण्यांत येणार आहे. या माहिती मध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी ईत्यादी), तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यांत आलेले कर्मचारी, अशा सर्व प्रकारच्या कर्मचा-यांची माहिती गोळा करण्यांत येणार आहे. त्यानुषंगाने 1 जुलै, 2026 या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय.डी, भविष्य निर्वाह निधी, डी.सी.पी.एस खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, कर्मचा-याचे संपूर्ण नांव, जन्मदिनांक, लिंग, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, सेवा निवृत्तीचा दिनांक, सेवेत रुजू झाल्यानंतरचे पदनाम, कर्मचा-यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, कर्मचा-यांचा ई-मेल आय.डी. सामाजिक प्रवर्ग, कर्मचा-याची जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांग व्यक्ती ईत्यादी स्थायी स्वरुपाची माहिती तसेच (लागू असल्यास) सध्याचे पदनाम, सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक, आश्वासित प्रगती योजना लाभ तसेच माहे जुलै, 2026 या संपुर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशिलवार माहिती गोळा करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तयार करण्यांत आली आहे. या आज्ञावलीत माहिती नोंदणीसाठी लॉग-इन आय.डी. व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व आज्ञावली वापराबाबत सूचनासंच लातूर जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांचे मार्फत संबंधित कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यांत येतील. कर्मचारी गणना 2026 मधील माहिती विहीत वेळेत अद्ययावत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाच्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी 15 सप्टेंबर,2026 पर्यंत लॉग-इन व पासवर्ड उपलब्ध करुन घ्यावेत. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 दरम्यान आहरण व संवितरण अधिका-यांनी माहिती ऑनलाईन सादर करुन करणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सादर केलेल्या माहितीमधील त्रुटींचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 15 डिसेंबर 2026 ते 30 नोव्हेंबर, 2026 पर्यंतप्राप्त करुन घ्यावे. लातूर जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांचेकडून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना माहिती भरल्या बाबतचे पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, 2026 च्या वेतन देयकासोबत जोडण्यासाठी व भरण्यांत आलेली माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाण-पत्र माहे फेब्रुवारी, 2027 च्या वेतन देयकासोबत जोडण्यासाठी निर्गमित करण्यांत येईल. पहिले व दुसरे प्रमाण-पत्र त्या - त्या महिन्याच्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयके जिल्हा कोषागार कार्यालय तसेच उपजिल्हा कोषागार कार्यालयास स्विकारली जाणार नाहीत, असे शासनाचे निर्देश आहेत. 2 सप्टेंबर, 2026 च्या शासन परिपत्रकान्वये ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हयांतील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करुन शासकीय कर्मचारी गणना 2026 बाबतचा माहितीकोष तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक उ. म. हत्ते यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत