लातूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी जिल्हास्तरीय 'वॉर रूम' पाणी आणि चारा टंचाईविषयक उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

लातूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी जिल्हास्तरीय 'वॉर रूम' पाणी आणि चारा टंचाईविषयक उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड · नुकसान पंचनामे कामकाज आणि सवलतींची अंमलबजावणीबाबत आढावा लातूर, दि. २८ : लातूर जिल्ह्यामध्ये मान्सून २०२६ मध्ये पर्जन्यमानातील घट आणि पावसाच्या सलग खंडामुले गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांची वाढ, उत्पादकता, भूजल पातळी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेवर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाई व चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने या अनुषंगाने उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या. लातूर जिल्ह्यातील सर्व दहाही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ट्रिगर १ अंतर्गत सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या सवलतींच्या अंमलबजावणीविषयी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. दुष्काळ जाहीर झालेल्या लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच या तालुक्यांमधील परिस्थितीबाबत तत्काळ पंचनामे सुरु करावेत असे निर्देश दिले आहेत. यासोबतच दुष्काळग्रस्त भागात विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी सवलतींची प्रभावी अंमलबजावणी आणि पंचनामेविषयक कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचे आणि पशुधनासाठी चारा याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. पाणी टंचाई निर्माण झाल्यास संबंधित गावाला पाणी पुरवठ्याचे पर्यायी जलस्त्रोत अगोदरच निश्चित करून ठेवावेत. तसेच उपलब्ध चारा आणि उपलब्ध होवू शकणारा चारा याबाबतचा आराखडा तयार करावा. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आणि पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. तसेच लातूर शहर पाणीपुरवठा जलवाहिनीच्या अवैध जोडण्या तोडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जलवाहिनीला गळती असल्यास त्याचीही तातडीने दुरुस्ती करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ स्थापन दुष्काळ निवारण कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि समन्वयासाठी जिल्हास्तरावर 'दुष्काळ निवारण कक्ष' (वॉर रूम) स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ आणि दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदींनुसार याबाबतचा आदेश जारी केले आहेत. या कक्षात महसूल, लातूर शहर महानगरपालिका, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम आणि नगर परिषद विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या वॉर रूमच्या १४ सदस्यीय पथकात समावेश करण्यात आला आहे. तसेच दुष्काळ निवारणासाठी विषयनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत