बहुदिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य; हरंगुळ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शालेय साहित्य वाटप

बहुदिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य; हरंगुळ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शालेय साहित्य वाटप लातूर, दि. २५ : शिक्षणाची स्वप्ने प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत असतात; मात्र काही मुलांच्या या स्वप्नांना समाजाच्या खंबीर आधाराची गरज असते. याच भावनेतून बहुदिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला माणुसकीचा आधार देणारा एक अत्यंत संवेदनशील उपक्रम हरंगुळ (बु.) येथे पार पडला. लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि आपले आरोग्य-आपलीच जबाबदारी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरंगुळ (बु.) येथील संवेदना सेरब्रल पाल्सी विकसन केंद्र (बहुदिव्यांग मुलांची शाळा) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांच्या हस्ते झाला. वह्या, पुस्तके आणि विविध शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील नवचमक उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक क्षण ठरला. या साहित्याच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना एक नवा आणि भक्कम आधार मिळाला आहे. या प्रसंगी उपक्रमास संवेदना सेरब्रल पाल्सी विकसन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम देशपांडे, सुरेश पाटील, कार्यवाह राहुल देशपांडे, संवेदना केंद्राच्या मुख्याध्यापिका दीपाताई पाटील, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समिती सदस्य वैजनाथ व्होणाले, व्यवस्थापक बसवराज पैके, दत्तात्रय परळकर, संजय राजुळे, वीरभद्र तुर्गुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुदिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. या उपक्रमातून केवळ शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले नसून, तुमच्या शैक्षणिक प्रवासात संपूर्ण समाज तुमच्यासोबत आहे असा दृढ विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आला. विशेष गरजा असलेल्या या मुलांना प्रेम, योग्य आधार आणि संधी मिळाल्यास त्यांच्या क्षमतांना नवे आकाश कवेत घेता येऊ शकते, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घेणे काळाची गरज आहे, असे श्री. गिरवलकर यांनी यावेळी सांगितले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत