‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत लातूर तालुक्यात सहा ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत लातूर तालुक्यात
सहा ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान
लातूर, दि. २५ : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या ज्या नागरिकांना सर्वसाधारण रहिवास ठिकाण निश्चित नसल्याने मूलभूत अधिकार आणि शासकीय योजनांचे लाभ मिळण्यास अडचणी येतात, अशा नागरिकांना मदत करण्यासाठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान ही विशेष मोहीम राबवली जात आहे. महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर तालुक्यात सहा ठिकाणी २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांना ओळखपत्रे आणि विविध शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. लातूर तालुक्यातील शामनगर-चंदनवाले, वैशाली नगर-राजगौंड, महादेव नगर-वैंदु, भोईवस्ती-भोई समाज, वडारवस्ती (खाडगाव रोड-वडार समाज) आणि मुरुड-वेदू समाज या ठिकाणी हे शिबीर पार पडणार आहे. या शिबीर नियोजनासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे भागवत केंद्रे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिबिरांमध्ये महसूल विभागामार्फत संकीर्ण विभागाद्वारे जात प्रमाणपत्र, रहिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि अधिवास दाखला यांसारखे विविध दाखले वितरीत केले जातील. तसेच पुरवठा विभागामार्फत नवीन रेशन कार्ड काढणे व दुरुस्तीचे अर्ज स्वीकारले जातील, संजय गांधी योजना विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेची माहिती देऊन अर्ज घेतले जातील, तर निवडणूक विभागाकडून मतदान कार्ड काढणे आणि नोंदणीविषयक माहिती व अर्ज स्वीकारले जातील. तरी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या जास्तीत जास्त नागरिकांनी २९ सप्टेंबर रोजी आयोजित या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment