‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ लातूर जिल्ह्यातील २,५२८ शाळांमध्ये स्वच्छता अभियान उत्साहात
▪️ लातूर जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये आयोजित विशेष उपक्रमात शिक्षक, विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर, दि. २७ (जिमाका) : शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली २६ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील २,५२८ शाळांमध्ये शाळा भरण्यापूर्वी एक तास अगोदर शाळा व शाळेच्या परिसरात ‘स्वच्छता अभियान’ हा विशेष उपक्रम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
लातूर तालुक्यात ३११ पैकी २९५ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून यामध्ये १,३४८ शिक्षक व १,५४० नागरिक सहभागी झाले, औसा तालुक्यात २८५ पैकी २७९ शाळांमध्ये उपक्रम राबवून १,३३२ शिक्षक व ८१२ नागरिक सहभागी झाले, निलंगा तालुक्यात ३३६ पैकी ३२७ शाळा सहभागी झाल्या असून ९७५ शिक्षक व ६५४ नागरिक सहभागी झाले, देवणी तालुक्यात ११७ पैकी सर्व ११७ शाळांमध्ये हा उपक्रम राबवून ६७८ शिक्षक व २६४ नागरिकांनी सहभाग घेतला, उदगीर तालुक्यात ३७१ पैकी सर्व ३७१ शाळांमध्ये मोहीम राबवली जाऊन १,०८८ शिक्षक व ९६५ नागरिक सहभागी झाले, जळकोट तालुक्यात ११६ पैकी १११ शाळांनी सहभाग घेतला असून ५२४ शिक्षक व ४५८ नागरिक सहभागी झाले, चाकूर तालुक्यात २०९ पैकी १८५ शाळांमध्ये मोहीम राबवून १,१०५ शिक्षक व ७९५ नागरिक सहभागी झाले.
अहमदपूर तालुक्यात ३०७ पैकी २९३ शाळांमध्ये उपक्रम राबवून १,७७९ शिक्षक व ६०३ नागरिक सहभागी झाले, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ८६ पैकी ७६ शाळा सहभागी झाल्या असून ३१२ शिक्षक व ४२४ नागरिक सहभागी झाले, रेणापूर तालुक्यात १५९ पैकी १४३ शाळांमध्ये मोहीम राबवून ४४६ शिक्षक व ६६७ नागरिक सहभागी झाले, लातूर युआरसी १ अंतर्गत १६० पैकी १४८ शाळांमध्ये उपक्रम राबवून ४५६ शिक्षक व ७५३ नागरिक सहभागी झाले, तर लातूर युआरसी २ अंतर्गत १९९ पैकी १७८ शाळांमध्ये मोहीम राबवून ७५४ शिक्षक व ८५३ नागरिक सहभागी झाले. अशा प्रकारे संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकूण २,६५१ शाळांपैकी तब्बल २,५२८ शाळांमध्ये यशस्वीरीत्या स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, यात एकूण १०,७९७ शिक्षक आणि ८,७८८ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या अभियानाचाच एक भाग म्हणून लातूर तालुक्यातील कासारखेडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षणाधिकारी विकास कुकडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन संपूर्ण शाळा परिसर अतिशय स्वच्छ केला. या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाधिकारी विकास कुकडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ शाळाच नव्हे, तर आपले घर, शाळा परिसर आणि पर्यायाने आपले संपूर्ण गाव नेहमी स्वच्छ ठेवण्याविषयी संदेश दिला. या स्वच्छता मोहिमेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
.jpeg)


Comments
Post a Comment